नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने देशभरात कार्यरत असणाऱ्या सर्व केंद्रीय कर्मचार्यांना भेट दिली आहे. आता केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशाच्या बाहेरही मोठा फायदा मिळणार आहे. त्यांना आरोग्य योजनेंतर्गत परदेशातही उपचाराची सुविधा उपलब्ध असेल. याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी चेन्नईच्या टीके दामोदरन यांना नुकत्याच दिलेल्या उत्तरात म्हटले की, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत परदेशातही उपचाराचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, पेन्शनधारकांना यातून वगळण्यात आलं आहे.
पत्रात म्हटले आहे की, सीएसएमए 1944 च्या नियम 11 नुसार, सरकारी कर्मचारी आणि त्याचे आश्रित कुटुंब देशाबाहेर उपचार घेऊ शकतात. याशिवाय आपला स्वत: आणि कुटुंबाच्या देशात किंवा परदेशात केलेल्या उपचारानंतर होणाऱ्या खर्चाच्या प्रतिपूर्तीचा दावादेखील केला जाऊ शकतो. तसेच यात स्पष्ट करण्यात आले आहे की, सरकारी कर्मचारी म्हणजेच केंद्र सरकार अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी जे अजूनही कर्मचारी आहेत आणि सरकारला सेवा देत आहेत, त्यांना याचा लाभ घेता येईल. केंद्रीय सेवा वैद्यकीय उपस्थितीच्या नियमांनुसार या योजनेंतर्गत पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना परदेशात उपचाराचा लाभ मिळणार नाही.