अहमदनगर : बंजारा समाजाच्या राज्यभरातून आलेल्या प्रमुखांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे ‘बंजारा फेस्टिव्ह’ उत्साहात पार पडला. दुर्गादेवी महिला लेंगी नृत्यपथक (कर्नाटक), विदर्भ महिला लेंगी पथक (अकोला), संत सेवालाल लेंगी पथक (वाशीम), चंदू नायक महिला लेंगी पथक (तेलंगाणा) आदी पथकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पाथर्डी शहरातील आनंदनगर येथे बंजारा समाजाचे आद्य गुरू संत सेवालाल महाराजांच्या २८० व्या जयंती सोहळयानिमित्त च्बंजारा फेस्ट २०१९ तीन दिवसीय कार्यक्रमो आयोजन करण्यात आले होते. सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. व्यासपीठावर रामराव महाराज भाटेगावकर, डॉ. आर. आर. राठोड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, बांधकांम समिती सभापती मंगल कोकाटे, नगरसेवक प्रवीण राजगुरू, मुख्य संयोजक विष्णुपंत पवार, सुनील ओव्हळ, पोलिस उपनिरीक्षक संभाजी वडते, कृष्णा राठोड (मुंबई), दुय्यम निबंधक बी. एस. जाधव, प्रभाकर पवार उपस्थित होते.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यासह राज्याच्या विविध भागांतून बंजाराबांधव उपस्थित होते. विजापूर (कर्नाटक) मधील बंजारा समाज़ाच्या लोकांनी पारंपरिक बंजारा वेषभूषेत येऊन सादर केलेले बंजारा नृत्य मुख्य आर्कषण ठरले. डफ व ढोलांचा तालबद्ध आवाज, पुरुषांचे टिपरी पथक लक्ष्यवेधी ठरले. ढवळपुरीचे उपसरपंच बबन पवार, रमेश जाधव (शेवगाव), हरिनगर तांड्यावरील अंबादास चव्हाण, आंबेवाडी येथील अमोल राठोड आदी समाज बांधवांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या, तालुक्यात विष्णुपंत पवारांसारखे सेवाभावी कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजासाठी सेवाभावी वृत्तीचे काम करत आहेत.
राज्याच्या विविध भागात बंजारा बांधव शिक्षण, व्यवसाय, सेवा क्षेत्रात अग्रेसर असण्याचे खरे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. बंजारा संस्कृती ही तांडे ,वाडया वस्त्यांमुळे जिवंत आहे. काळानुसार समाजापुढील प्रश्नांचे स्वरूप व व्याप्ती वाढत आहे. संघटित राहून व सर्वांना बरोबर घेऊनच पुढे जावे लागेल. मतदारसंघातील दुर्गम व उपेक्षित चार तांडयांना महसुली गावांचा दर्जा दिला. जिल्हयात दीड कोटी रुपयांचा तांडा सुधार योजनेसाठी निधी मिळाला. उर्वरित सहा तांड्यांना नव्या आर्थिक वर्षात महसुली गावांचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कार्यक्रमासाठी विलास पवार, काळू जाधव, सचिन चव्हाण, संजय राठोड, संदीप राठोड, विनायक राठोड आदींनी परिश्रम घेतले. या वेळी अण्णासाहेब पवार, नवनाथ चव्हाण, दत्तू चव्हाण यांनी महाप्रसादाची सेवा केली. संदीप पवार व सचिन चव्हाण या शिक्षकांच्या कल्पनेतुन साकार झालेल्या सेवालाल विचारसृष्टी चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला. प्रास्ताविक विष्णुपंत पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राजू पवार यांनी केले. डॉ. संदीप पवार यांनी आभार मानले.