Camil Parkhe’s Book | सत्यशोधक वारसा जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत : शरद पवार

पुणे : Camil Parkhe’s Book | कामिल पारखे Camil Parkhe (पत्रकार व सत्यशोधक संशोधक) यांनी लिहिलेल्या “सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्री शिक्षणातील पूर्वसुरी” या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन आज माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात झाले.
यावेळी लेखक कामिल पारखे, चेतक प्रकाशक चे मदन हजेरी, माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ संपादक अरुण खोरे आणि अंनिस विश्वस्त समितीचे अध्यक्ष गणेश चिंचोले तसेच अंनिस ट्रस्ट चे सचिव दीपक गिरमे हे उपस्थित होते. याबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
शरद पवार म्हणले, “महात्मा फुले यांची प्रतिमा समाजसुधारक या पलिकडे जाऊन एक उद्योजक, एक शिक्षण प्रसारक, बांधकाम व्यावसायिक, महत्त्वाकांक्षी धोरणी व्यक्तिमत्त्व, शेतीमधील क्रांतीचे उद्गाते म्हणून त्यांची ओळख समाजाला करून द्यावी. आजच्या काळात फुले हे निश्चितच प्रतिगामी शक्तींशी लढण्याची प्रेरणा देतात असे ते एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व होते. फुलेंच्या आधीच्या व नंतरच्या सत्यशोधकांचा आपण सतत शोध घ्यावा यासाठी सदिच्छा !”
लेखक कामिल पारखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील आणि इतर कार्यामागे आतापर्यंत इतिहासाच्या पडद्याआड राहिलेल्या अनेक व्यक्तींचा हातभार लागला होता. गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब ही त्यापैकी सुरुवातीची दोन नावे. कुठल्याही महान व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या काळात असलेली परिस्थिती, त्या काळातल्या घटना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचाही अभ्यास करावा लागतो. फुले दाम्पत्याच्या समकालीन व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास केला की त्या कालखंडातील परिस्थितीचे खरेखुरे आकलन होते. जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल, सावित्रीबाईंना अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरार आणि मिसेस मिचेल, तसेच जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, मागरिट विल्सन आणि जॉन मरे मिचेल यांची नावे सावित्रीबाई आणि जोतिबांच्या विविध चरित्रांत विविध संदर्भात येतात. मात्र, या व्यक्तींबाबत माहिती देणारे आणि त्याद्वारे फुले दाम्पत्याच्या जीवनावर नवा प्रकाश टाकणारे लिखाण आतापर्यंत झालेले नाही. या पुस्तकामुळे ही कसर भरुन निघेल असा विश्वास वाटतो.”
अंनिस राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी प्रास्तविक केले. राहुल माने याने सूत्रसंचालन केले. एलिझाबेथ पारखे यांनी आभार मानले. अंनिस राज्य कार्यकारी समिती सदस्य मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव यावेळी उपस्थित होते.