नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए आणि एनआरसी विरोधात संपूर्ण देशात वातावरण पेटले आहे. तर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या एका ७५ वर्षीय सदस्याने शुक्रवारी सीएए आणि एनआरसी यांचा निषेध करताना स्वतःला पेटवून घेतले आहे. ही घटना शहरातील गीता भवन चौकात घडली असून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्यांना वाचवले आहे. तेथे असलेल्या लोकांनी रूग्णवाहिकेच्या मदतीने वयोवृद्धाला महाराज यशवंतराव रुग्णालयात पाठवले. सध्या त्यांच्यावर बर्न युनिटवर उपचार सुरु आहेत.
या वयोवृद्धांचे नाव रमेश प्रजापत असून ते अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाशी जोडलेले आहेत. त्यांना स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पण तेथील लोकांनी त्यांना वाचवले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी रमेश यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. रमेश यांच्या खिशातून पोलिसांना सीएएशी संबंधित काही पत्रकेही मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
रमेश यांच्याशी ओळख असलेल्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार रमेश हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे सदस्य असून जामा मशिदीमध्ये सुरु असलेल्या सीएएच्या निषेधांमध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच सीएएचा निषेध करण्यासाठी रमेश आणि त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी शहरात जाऊन लोकांची भेट घेतली. पण त्यांनी स्वतःला पेटवून का घेतले, याबद्दल अजूनही कोणती माहिती मिळाली नसून पोलीस त्यांच्या व कुटूंबियांची जबाब नोंदवित आहेत आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.