कोलकत्ता : वृत्तसंस्था – जाधवपूर युनिर्व्हसिटीमध्ये मास्टर डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या पोलंडच्या विद्यार्थ्याला सीएए विरोधातील रॅलीत सहभागी होणे चांगले महागात पडले आहे. केंद्र सरकारने व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्याला १४ दिवसात देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे. या विद्यार्थ्याने हायकोर्टात धाव घेतली आहे.
जाधवपूर युनिर्व्हसिटीमध्ये कामिल सिदस्यंसकी हा सध्या शिकत आहे. त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यास केवळ चार महिने बाकी राहिले आहेत. जाधवपूर युनिर्व्हसिटीतील काही विद्यार्थीबरोबर कोलकत्तामधील न्यू मार्केट परिसरात एका कार्यक्रमाला गेला होता. तेथे सीएए विरोधात शांततापूर्वक आंदोलन केले जात होते. त्याचवेळी तेथे कामिलही होता. एका पत्रकाराने त्यावेळी त्याला काही प्रश्न विचारले. त्याचे वृत्त दुसऱ्या दिवशी त्याच्या फोटोसह वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. या प्रसिद्ध झालेल्या बातमीवरुन केंद्र सरकारने देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे.
या नोटिस विरोधात कामिलने हायकोर्टात धाव घेतली आहे. त्याचे वकील जयंत मित्रा यांनी सांगितले की, तो विद्यार्थ्यांबरोबर न्यू मार्केटला गेला होता. पण जेव्हा ते आंदोलन करणार असल्याचे समजल्यावर तो त्यांच्यापासून दूर झाला व कडेला दर्शक म्हणून थांबला होता. त्याला कोणतीही ओळख न सांगता एक पत्रकार भेटला व त्याने त्याच्याविषयी उलटसुलट छापले आहे.
कामिल याने परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयालाही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या चुकीतून आपण खूप काही शिकलो असून असे पुन्हा होणार नाही, असे वचन देतो, असे या विनंती अर्जात म्हटले आहे.