बहुजननामा ऑनलाइन टीम – सुरत : वृत्त संस्था – गुजरात मधील सुरत शहरातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबाकडून १ कोटी रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.
उद्योजक अन्वर दुधवाला यांचा मुलगा कोमिल (वय ३६) हा गुरुवारी सकाळी जीममधून मोटारसायकलवरुन घरी परत येत असताना चार जणांनी कोमिलला अडविले. मोटारसायकलवरुन त्याला खाली पाडून जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर त्यांनी अन्वर यांना फोन करुन मुलाच्या सुटकेसाठी ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली. अन्वर यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून अपहरणाची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांच्या सूचनेनुसार दुधवाला यांनी अपहरणकर्त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यानंतर त्यांना खंडणी म्हणून १ कोटी रुपये देण्याची तडजोड करण्यास सांगितले. त्यानुसार दुधवाला यांनी अपहरणकर्त्यांना १ कोटी रुपये दिले. आरोपींनी पैसे मिळल्यानंतर गुरुवारी रात्री कामरेज महामार्गावर दुधवाला यांचा मुलगा कोमिल याला सोडून दिले. मुलगा सुखरुप परत आल्याचे समजल्यानंतर सुरत पोलिसांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध फास आवळण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरत गुन्हे शाखेने बडोदा येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ४ जणांना अटक केली. त्यांच्याकडे ९९ लाख १४ हजार रुपयांची रोकड आढळून आली. त्यानंतर अन्य चार जणांना सुरत -बडोदा महामार्गावरील कोसंबा पुलाजवळून अटक केली, अशी माहिती सुरतचे पोलीस आयुक्त ए़ के़ तोमर यांनी दिली