चिकना गावावर शोककळा पसरली;तंबाखू च्या पानांना धूर देण्याची पद्धतीने घेतला दोघांचा बळी
धर्माबाद : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – तंबाखूच्या भट्टीत पडल्याने बाप – लेकाचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (धर्माबाद) येथे सोमवारी (ता.१८) रोजी दुपारी उघडकीस आली. शेख चांद पाशा शेख खाजामिया (वय ५५) व त्यांचा मुलगा शेख वंशोद्दीन शेख चांद पाशा (वय २२) यांचा होरपळून अंत झाला आहे.
धर्माबाद तालुक्यातील दुर्दैवी घटना तंबाखुचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. तंबाखूच्या पानांना धूर देण्याची पद्धत आहे. सदर तंबाखू परिपक्व करण्यासाठी त्याला धुरावर भाजणे गरजेचे असते. म्हणून नेहमीप्रमाणे हे पितापुत्र आपल्या शेतातील तंबाखूला धूर देण्यासाठी रविवारी दि १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या शेतात गेले. दिवस संपायला येऊनही ते घरी न परतल्याने सोमवारी दि १८ रोजी सकाळी नातेवाईक शेताकडे गेले असता हा धक्कादायक प्रकार दिसला.
त्यानंतर एकच खळबळ उडाली. तंबाखूच्या भट्टीत त्यांचा मृतदेह आढळून आला.दोघांचेही मृतदेह पुर्णपणे जळून खाक झाले होते. याबाबतची माहिती धर्माबाद पोलिसांना मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मृतदेह भट्टीतून बाहेर काढून धर्माबाद शासकिय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी दिली.