बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळातल्या या अर्थसंकल्पाकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा असल्या तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच लक्ष त्यांच्या आयकरात काही बदल होतो का आणि टॅक्स स्लॅब बदलतो का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याबाबतीत मध्यमवर्गीय नोकरदारांची निराशा केली आहे.
देशातील 75 वर्षावरील नागरिकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्त्पन्नावर रिटर्नपासून मुक्ती मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज घोषणा केली आहे. तर 2021 च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थातच करमुक्त उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा फार काही बदल अपेक्षित नाहीत.
ज्येष्ठ नागरिकांना कायदा
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात ज्येष्ठांना नमन करताना मी त्यांच्यासाठी नवी तरतूद केली आहे. 75 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि त्यावरील व्याजातूनच उत्पन्न मिळते त्यांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्त्पन्नावर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.
आयकराची गणना अशाप्रकारे होऊ शकते
सर्वप्रथम संबंधित व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नाची गणना करणे गरजेचे आहे. एकूण पगारातून सर्व उपलब्ध वजावटी आणि सुट वगळता, जसे लीव्ह ट्रॅव्हल अलाऊंस (LTA), घरभाडे भत्ता (HRA) या गोष्टी समायोजित करुन करपात्र उत्पन्नाची गणना केली जाऊ शकते. त्यानंतर जर आपला पगार आयकराच्या चौकटीत येत असेल तर तो कोणत्या स्लॅबखाली येतो हे तपासणे गरजेचे आहे.
तुमचा स्लॅब कोणता ?
2020 – 21 या वर्षात 2.5 लाखापर्यंत इनकम असणाऱ्यांसाठी 0 टक्के आयकर होता. तर 2.5 -5 लाखाच्या दरम्यान इनकम असणाऱ्यांना 5 टक्के, 5-7.5 लाखापर्यंत 10 टक्के, 7.5-10 लाखापर्यंत 15 टक्के, 10-12.5 लाखापर्यंत 20 टक्के, 12.5-15 लाखापर्यंत 25 टक्के आणि 15 लाखावरील इनकम असणाऱ्यांना 30 टक्के आयकर भरावा लागत होता.