नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणल्या असून ब्रॉडबँड ग्राहकांसाठी ९९ रुपयात गुगल नेस्ट मिनी आणि १९९ रुपयात प्रति महिना गुगल नेस्ट हब ऑफर देत आहे. ही ऑफर १८ फेब्रुवारीपासून सुरु केली असून याची वैधता ९० दिवसांची आहे.
यातील गुगल नेस्ट मिनी नोव्हेंबर २०१९ मध्ये सादर केला असून याची किंमत सुरुवातीला ४,४९९ रुपये असताना फ्लिपकार्टवर याची किंमत ३,९९९ रु. आहे. तर गुगल नेस्ट हबची किंमत ९,९९९ रु. असून त्याची किंमत फ्लिपकार्टवर ८,९९९ रु. आहे. या दोन्ही ऑफर ईएमआयवर खरेदी करू शकता. या ऑफरचा फायदा त्यांना होईल, जे ग्राहक ७९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्लॅनचे वार्षिक सब्सक्रिप्शन घेतील. सेकंड जनरेशन स्मार्ट स्पीकर गुगल नेस्ट मिनी खरेदी करायचे असल्यास युजर्संना १२८७ रुपयांचा वन टाइम युसेज चार्ज द्यावा लागणार आहे.
तुम्हाला जर गुगल नेस्ट हब घ्यायचा असेल तर २,५७८ रु.चे वन टाईम पेमेंट करावे लागेल. गुगल नेस्ट हब स्मार्ट डिस्प्लेचा स्पीकर असून तो ७ इंचाचा टचस्क्रीन पॅनेल, फ्रंटला EQ Light सेन्सर, दोन फार फील्ड मायक्रोफोन आणि एक फुल रेंज बॅक स्पीकर आहे. तुम्ही बीएसएनएल डीएसएल किंवा भारत फायबर कस्टमर कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर अडवॉन्स पेमेंट केल्यानंतर वार्षिक सब्सक्रिप्शन घेऊ शकता. सध्या ही ऑफर चेन्नई बीएसएनएलच्या सब्सक्रायबर्ससाठी उपलब्ध आहे.