नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना आज पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक राकेश डोवाल यांना वीरमरण आले आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण सीमारेषेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू असून, बीएसएफचे जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. राकेश डोवाल हे बीएसएफच्या युद्धसामग्री बॅटरी युनिटमध्ये तैनात होते. दुपारी सव्वा एकच्या दरम्यान पाकिस्तानकडून झालेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचादरम्यान ते शहीद झाले.
#WATCH | Pakistan violated ceasefire along Line of Control in the Keran sector, of Jammu and Kashmir, earlier today pic.twitter.com/zQRLrSyxhc
— ANI (@ANI) November 13, 2020
त्याशिवाय आणखी एक जवान वासू राजा जखमी आहेत. त्यांना गळा आणि हाताला दुखापत झाली आहे. दोघेही शत्रूला प्रत्युत्तर देण्याच्या मोहिमेवर तैनात होते. आता राजा यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
तीन जवान शहीद
दरम्यान, दिवाळीपूर्वी दहशदवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू आहे. पाच दिवसांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील किरण सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. शहीदांमध्ये दोन सैन्याचे तर एक सीमा सुरक्षा दलाचा जवान होता. दहशवाद्यांविरुद्ध मोहिमेत भारतीय जवान प्राणांची बाजी लावत असून, त्यांच्यासोबत सीमा सुरक्षा दलाचे जवान, अशी संयुक्त मोहीम सुरू असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.