मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – दोन वर्षांपूर्वी मुंबईत क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून १३ जणांचे प्राण वाचवलेल्या झेन सदावर्ते या मुलीला शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यात देशातील १० मुलं आणि १२ मुलींचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलल्याचं झालं तर मुंबईतील झेन सदावर्ते ही मुलगी तर औंरंगाबादचा आकाश खिल्लारे यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
शाळेतल्या धड्याची प्रेरणा घेतली
मुंबईतील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतून दोन वर्षांपूर्वी झेनने 13 जणांचा जीव झेन ने वाचवला होता. आग भडकली असताना प्रसंगावधान दाखवलं होतं. त्यावेळी शाळेत शिकवलेल्या धड्याचा तिला उपयोग झाला होता.आगीमुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण वाढतं. अशा परिस्थितीत गुदमरून मृत्यू होऊ शकतो. तेव्हा तोंडावर ओलं कापड ठेवल्यास श्वास घ्यायला त्रास होत नाही अशी माहिती झेन शाळेत शिकली होती. याच माहितीचा तिला आगीत अडकलेल्या 13 जणांचे प्राण वाचवण्यासाठी उपयोग झाला होता.
आकाश खिल्लारेने दाखवले अभूतपूर्व धाडस
औरंगाबादच्या आकाश खिल्लारेलासुद्धा शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा जीव वाचवला होता. आकाश शाळेला जात असताना मायलेकी नदीमध्ये बुडत असल्याचं दिसल्या होत्या. तेव्हा आकाशने कोणताच विचार न करता त्या दोघींना वाचवलं होतं. नदीवर कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या. त्यावेळी मुलगी पाण्यात बुडाली म्हणून आईने तिला वाचवायला पाण्यात उडी मारली होती. मात्र आईसुद्धा बुडायला लागली. दोघी बुडत असल्याचे दिसताच आकाशने नदीत उडी मारून दोघींना सुखरूप बाहेर काढलं होतं. झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना देशभरातील लहान मुले आणि मुलींसोबत हा पुरस्कार मिळणार आहे.