कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – प्रियसीच्या वडिलांनी घरात येऊन तलवारीचा धाक दाखवत धमकी दिल्याने २५ वर्षीय प्रियकराने शुक्रवारी विषारी औषध पिले. दरम्यान उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. ही घटना फराकटेवाडी (ता कागल) येथे घडली असून अभिजित संभाजी फराकटे असे या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
अभिजीतचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही माहिती त्या मुलीच्या वडिलांना समजली. त्यांनी थेट अभिजीतच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ केली तसेच त्याला तलवार दाखवत धमकीही दिली. या घटनेमुळे अभिजित घाबरला होता. प्रियसीचे वडील आपल्याला मारणार या भीतीने त्याने घरात असलेले ग्रामोझोन तणनाशक पिले. हे घरातील लोकांना समजले असता अभिजीतला कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान , शनिवारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.