न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – एक 14 वर्षांचा मुलगा आपल्या 11 वर्षाच्या गर्लफ्रेंडसह कारमधून घराबाहेर पळाला. मुलाने गुप्तपणे वडिलांची गाडी बाहेर काढली आणि मग स्वत: गाडी चालवत पळून गेला. तो हायवेवर वेगाने कार चालवित असल्याचे आढळले.
अमेरिकेतील न्यूयॉर्कची ही घटना आहे. घरापासून 1900 किलोमीटरवर पोचल्यावर पोलिसांना मुलाला पकडण्यात यश आले.
14 वर्षीय मुलाचे नाव केविन फिगुरोस आहे. तो न्यूयॉर्कहून आयोवा राज्यात गेला होता. रविवारी त्याला आयोवा येथे पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आता त्याला न्यूयॉर्क येथे आणण्याची तयारी सुरू आहे.
गुरुवारी मुलाच्या बेपत्ता होण्याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली होती. मुलगा वडिलांच्या टोयोटा कंपनीची मिनी व्हॅन घेऊन घराबाहेर पडला. पोलिसांनी सांगितले की, हा मुलगा 150 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवित असल्याचे आढळून आले, तर त्या रस्त्यावरील वेग मर्यादा 104 किमी प्रतितास होती. मात्र, तो मुलगा घरातून का पळून गेला हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही.