राज्यात कोरोनाचा उद्रेक ! उच्च न्यायालयाकडून सामूहिक नमाज पठाणाची परवानगी नाकारली

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे केवळ 50 जणांच्या उपस्थितीत दिवसातून 5 वेळा नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका दक्षिण मुंबईतील जुमा मस्जिद ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र नागरिकांचे आरोग्य हेच महत्वाचे असल्याचे सांगत कोर्टाने परवानगी नाकारली आहे. कोरोनाची सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता अशी परवानगी देता येत नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने परिस्थिती भीषण होत आहे. म्हणूनच राज्य सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि ब्रेक दी चेन अंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांचे आरोग्य हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा संवेदनशील आणि खडतर परिस्थितीत याचिकादारांना सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यास परवानगी देता येणार नसल्याचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री जनतेशी संवाद साधत कडक निर्बंधांची घोषणा केली. राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत करोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे पर्यंत कलम 144 लागू करत संचारबंदी केली आहे.
Comments are closed.