बहुजननामा ऑनलाईन टीम – शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील असल्फा भागात हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुन ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना मुंबई हायकोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमुर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमुर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
काय आहे हे प्रकरण
कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने अरुण गवळीच्या गँगमधील 2 व्यक्तींना जामसांडेकर यांची हत्या करण्यास सांगितले. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हे करण्यासाठी 30 लाखांची सुपारी मागितली. गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले. श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले आणि अॅडव्हान्स म्हणून २०-२० हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्का अंतर्गत साल 2008 मध्ये अरुण गवळीला अटक केली होती. 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र न्यायालयाने ते फेटाळून लावलं.
Visit : bahujannama.com