नवी दिल्ली: वृत्तसंस्था – देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र असे असतानाच आता ब्लॅक फंगसने (म्युकरमायकोसिस) आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून येत असून या रुग्णांमध्ये काही समान धागे आहेत. त्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका कशामुळे निर्माण झाला याची माहिती समोर आली आहे.
एँटिबायोटिक्स, गरम वाफ जास्त प्रमाणात घेणा-यांना ब्लॅक फंगसचा अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. एँटिबायोटिक्सचा वापर केलेल्या 210 जणांवर केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. अँटिबायोटिक्स तसेच स्टेरॉईड्सचा वापर करणाऱ्यांनादेखील ब्लॅक फंगसचा धोका असल्याची माहिती मध्य प्रदेशच्या महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे डॉ. व्ही. पी. पांडे यांनी दिली. डॉ. पांडे यांनीच 210 रुग्णांची माहिती घेऊन ब्लॅक फंगसबद्दल एक अहवाल तयार केला आहे. ब्लॅक फंगसची लागण झालेले 14 टक्के रुग्ण स्टेरॉईड्सचा वापर करत होते. आरोग्य मंत्रालयानेही ब्लॅक फंगसची लागण होण्यास स्टेरॉईड्स जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अँटिबायोटिक्स, स्टेरॉईड्स सोबतच ब्लॅक फंगसची लागण झालेल्यांमध्ये आणखी एक समान बाब आहे. गरम वाफ जास्त प्रमाणात घेणाऱ्यांना ब्लॅक फंगसचा अधिक धोका आहे. ब्लॅक फंगसची शिकार झालेल्या अनेकांनी जास्त प्रमाणात वाफा घेतल्या होत्या. आयएमएच्या कोच्ची चॅप्टरचे माजी प्रमुख डॉ. राजीव जयवर्धन यांनी याबद्दल धोक्याचा इशारा दिला. आपल्या शरीरावर एक थर असतो. शरीराला सूक्ष्मजंतूंपासून वाचवण्याच काम हा थर करतो. अधिक प्रमाणात वाफा घेतल्यामुळे या थराला हानी पोहोचते आणि ब्लॅक फंगसचा धोका वाढतो, असे डॉ. जयवर्धन यांनी सांगितले.