जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकांचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजप मध्ये चांगलेच सत्तानाट्य पाहायला मिळाले. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेनेने भाजपसोबत असलेली ३० वर्षांची युती तोडून भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. पण भाजप आणि शिवसेनेची युती जरी तुटली असली तरी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत गेल्याचे चित्र दिसत असून जळगाव मध्ये हे चित्र दिसले आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपच्या महापौरांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा सीमा भोळे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यांनतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात भाजपकडून भारती सोनावणे यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा भारती सोनावणे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेने भाजपाला समर्थन दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या दरम्यान त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला असून त्यांच्याविरुद्ध अर्ज नसल्यामुळे सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली असून तिथे भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भारती यांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे गर्दी होती.
Visit : bahujannama.com