मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार राज्यात महायुतीला पुन्हा कौल मिळणार असल्याची चिन्हे असतानात सहा विद्यमान मंत्र्यांचा पराभव जिव्हारी लागणारा ठरणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेची अवस्था गड आला पण सिंह गेले अशीच असणार आहे.
भाजपच्या मंत्र्यांपैकी परळीतून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कर्जत-जामखेडमधून जलसंधारण मंत्री राम शिंदे तर मावळमधून बाळा भेगडे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागणार आहे. तसेच शिवसेनेच्या तीन मंत्र्यांचा पराभव झाला आहे. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे पुरंदरमधून, जयदत्त क्षीरसागर बीडमधून तर अर्जुन खोतकर जालन्यातून पराभूत झाले आहेत.
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांचा अटीतटीच्या लढतीत भाऊ धनंजय मुंडे यांनी पराभव केला. तर कर्जत-जामखेडमध्ये शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला. दोन्ही लढतींकडे राज्याचे लक्ष लागले होते. तर बीडमधील काका – पुतण्याच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. दरम्यान, राज्यात सहा विद्यमान मंत्र्यांचा पराभव म्हणजे भाजप-शिवसेनेला धक्का मानला जात आहे. तर राज्यातील इतर लढतीत मुख्यमंत्री फडणवीस, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार आदी बहुसंख्य दिग्गज आपले मतदारसंघ राखण्यात यशस्वी झाले आहेत.
Visit : bahujannama.com