मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पंकजा मुंडे यांनी भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे. तो पुन्हा मूठभर लोकांचा करू नका, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं.
भाजपा हा माझा पक्ष आहे. काही जण म्हणतात बापाचं घर, बापाची जमीन, तसा हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असं म्हणत मुंडेंनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडेंच्या कामाची आठवण करुन देत त्यांनी भाजपातील राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
गोपीनाथ गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहन केलं. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतंय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असंही पंकजा म्हणाल्या.