मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – परिवहन विभागातील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि काही परिवहन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी तक्रार नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार तेथिल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. तक्रारीतील मजकूर पाहता त्यात अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करणे न्यायोचित होणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. दरम्यान परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटरद्वारे कोकणी भाषेत परब यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला आहे.
नितेश राणे Nitesh Rane यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमचे हरकुळचे परब.. गेले त्यांच्या कलानगरच्या सायबाकडे. सायबाक सांगितल्यानी, सोमय्यांपासून माका वाचवा, मात्र सायबाण उत्तर दिल्याने. तू तूझा बघू घे. आता कळला ना परबांनू.. आम्ही काय बोलत होतव ते. तुमचा स्वागत आसा असे म्हटले आहे. दरम्यान पाटील यांनी केलेल्या तक्रारीत उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या कशा मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत याचा तपशील तक्रारीत दिला आहे. तसेच परिवहन मंत्री परब हे त्यांना संरक्षण देतात, असे तक्रारीत म्हटले आहे. खरमाटे यांनी कोणत्या अधिकाऱ्यांकडून किती रक्कम बदल्या, पदोन्नतीसाठी घेतली याचे उल्लेख तक्रारीत आहेत.
आमचे हरकुळचे परब..गेले त्यांच्या कलानगरच्या सायबा कडे!!
सायबाक सांगितल्यानी..
“सोमय्या पासून माका वाचवा” ..मात्र सायबाण उत्तर दिल्यान..
“तू तुझा बघून घे” !!आता कळला ना परबांनू..आम्ही काय बोलत होतव ते !!
तुमचा स्वागत आसा…!
— nitesh rane (@NiteshNRane) May 28, 2021
त्याने केलेल्या आरोपाबाबत मला माहिती नाही- अनिल परब
तक्रार करायची आणि सीबीआय चौकशीची मागणी करायची असे सध्या राजकीय फॅड निघाले आहे. खात्यातील आयुक्त, अधिकारी सर्वांवर आरोप करणारे पाटील हे निलंबित अधिकारी आहेत. एका निनावी पत्राची चौकशी करा, अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी चौकशी करण्याच्या आधीच ते न्यायालयात गेले. या अधिकाऱ्याला मी बघितलेले नाही. त्याने केलेल्या आरोपांबाबत मला माहिती नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.