बहुजननामा ऑनलाईन टीम : सोमवारी हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने जरी केलेल्या ‘ग्रोही हुरुन इंडिया रीयल एस्टेट रिच लिस्ट २०१९” नुसार भाजपाचे आमदार आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोढा यांचे एकूण वार्षिक उत्पन्न ३१ हजार ९३० कोटी रूपये इतके आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्येदेखील लोढा यांना पहिलं स्थान देण्यात आलं होतं, त्यामुळे यंदाच्या यादीतही त्यांनी आपला क्रमांक राखून ठेवला आहे.
दरम्यान, जाहीर केलेल्या या यादीत लोढा यांच्यानंतर डिएलएफचे उपाध्यक्ष राजीव सिंग हे २५ हजार ८० कोटी रूपयांच्या वार्षिक उत्पन्नासहित दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत राजीव सिंग हे तिसऱ्या क्रमांकावर होते. तसेच एम्बेसी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र विरवानी यांना या यादीत तिसरं स्थान असून त्यांच्याकडे २४ हजार ७५० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्न आहे. निरंजन हिरानंदानी यांना १७ हजार ३० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह चौथं, चंदू रहेजा यांना १५ हजार ४८० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह पाचवं आणि विकास ओबेरॉय यांना १३ हजार ९१० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह सहावं स्थान देण्यात आलं आहे.
लोढा कुटुंबीयांचे ३१ मार्चपर्यंत एकूण ४० प्रकल्प सुरू होते. मंगलप्रभात लोढा हे भाजपाचे मुंबई अध्यक्षदेखील आहेत. गेल्या वर्षभरात लोढा कुटुंबीयांच्या एकूण उत्पन्नात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर राजीव सिंग याच्या एकूण उत्पन्नात गेल्या वर्षभरात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील १०० मोठ्या व्यावसायिकांचं एकूण उत्पन्न २ लाख ७७ हजार कोटी रूपये इतकं आहे. या वर्षी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ६ कंपन्यांनी २ हजार कोटी रूपयांची तर अन्य २० कंपन्यांची १ हजार कोटी रूपयांची विक्री केली.
Visit : bahujannama.com