बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने एका उमेदवाराची निवड केली आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत दोन वेळा भाजपचे उमेदवार राहिलेले दीपक पवार हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिवेंद्रराजे यांच्या विरोधात पवार यांच्या उमेदवारीमुळे भविष्यात शिवेंद्रराजे यांच्या अडचणी वाढणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (ता. २२ ) साताऱ्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ‘शिवेंद्रराजे हटाव’चा नारा देत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. मागील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्याविरोधात पवार यांनी अटीतटीची लढत दिली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. त्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर साताऱ्याच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघाला लागलेल्या गळतीमुळे इथे पहिल्यांदाच भाजपची सत्ता येणार असल्याची चिन्हं आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातली एकही जागा भाजपला मिळाली नव्हती.
आता मात्र भाजपची मेगा भरती पाहता समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशामुळे भाजपचे नेते दीपक पवार यांचा पत्ता कट झाला. त्यांना भाजपने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचं अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जाही दिला. पण नाराज झालेल्या दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे आणि खासदार उदयनराजे यांच्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यावेळी 4 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Visit : bahujannama.com