मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबई येथे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांना धारेवर धरले. ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारबाबत केले तर आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढत आहे का ? हा दुटप्पीपणा चालणार नाही. संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. संजय राऊत यांचे रोज उठून नाटक चालले आहे. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असे तिला वाटते. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो’.
दरम्यान, सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) संजय घोडावत यांचीही चौकशी झाली पाहिजे. मला थेट अजित पवार यांचे नाव घ्यायचे नाही. मी केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, एवढेच म्हणत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे