मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी सुरूवात करून काल मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची आणि भाजपाला अनुकूल अशी वाट धरल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या बदललेल्या या वाटेवर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेच्या हिंदुत्वाचे स्वागत केले आहे. शिवसेनेशी फारकत झाल्यानंतर राज्यात भाजपाला मोठा मित्रपक्ष उरलेला नाही. अशा स्थितीत मनसे भाजपाशी हातमिळवणी करू शकतो अशी चर्चा सुरू असतानाच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या युतीचेही संकेत दिले आहेत.
मनसेचे इंजिन हिदूत्वाच्या रूळावर आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे स्वागत केले असले तरी आगामी युतीच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी एक अट सांगितली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेने परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपाला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला हवी. मनसेने परप्रांतियांबाबत असणारी भूमिका बदलली तर भाजपा मनसे एकत्र येऊ शकतात, असे पाटील म्हणाले.
तसेच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मनसेने विचारधारा बदलल्यास एकत्र येऊ शकतो. महाविकास आघाडीतील पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर मग आम्ही सत्यासाठी सोबत का येऊ शकत नाही, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आगामी काळात भाजपा-मनसे एकत्र येणार असल्याचेच संकेत दिल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या कालच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत हिंदूत्वाची कास धरली. मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही. आमचा मराठीचा मुद्दा कायम आहेच, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन, असे ठाकरे यांनी म्हटले होते.
Visit : bahujannama.com