नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तींचा पाकिस्तान आणि तेथील गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरुन बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचे पुरावे असल्याचेही म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कोणात्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही.
पांडा यांनी ट्विटवरुन बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयच्या व्यक्तींशी व्यक्तीगत आणि व्यवसायिक संबंध असल्याचे म्हटले आहे. बॉलिवूडमधील काही व्यक्तींचा काश्मीरमध्ये हिंसा पसरवणार्या तसेच अनिवासी भारतीयांसोबत वैयक्तीक संबंध आहेत. हे संबंध दाखवणारे काही कागदपत्रे मी पाहिली आहेत. काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी ओळखल्या जाणार्या पाकिस्तान आणि आयएसआयशी असलेले संबंध यामधून उघड होत आहेत. मी बॉलिवूडमधील देशभक्तांना आवाहन करतो की अशा लोकांबरोबर त्यांनी काम करु नये, असं पांडा यांना म्हटले आहे.जय पांडा यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता सोशल मिडियावर नव्या चर्चांना उधाण आले आहे. जर पुरावे मिळाले असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.