मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसेने मराठीसोबत हिंदुत्वाचा झेंडाही हातात घेतला असून आता मनसे आणि भाजप यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज यांची भेट घेतल्याची आणि या दोन नेत्यांमध्ये तासभर वेगवेगळ्या विषयांवर बोलणी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
शेलार हे बुधवारी संध्याकाळी सात वाजता कृष्णकुंज येथे दाखल झाले असता नंतर तासभर ते तेथेच होते. तेव्हा त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसे ९ फेब्रुवारीला मुंबईमध्ये मोर्चा काढणार असून हा मोर्चा नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाराच असणार आहे. तसेच या मोर्चाला भाजपचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा असणार आहे. माध्यमांना कोणतेही माहिती नसताना या दोन नेत्यांची भेट झालेली आहे.
तसेच भाजपला मनसेने हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतला म्हणून ते आपला नवा मित्र पक्ष होऊ शकतो, असे वाटत आहे. तसेच या दोन पक्षातील नेत्यांच्या भेटी वाढत चालल्या असून ७ जानेवारीलाच प्रभादेवी येथे इंडिया बुल्स स्काय येथे फडणवीस आणि राज यांची भेट झाली होती. मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करणार असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे, असे म्हणून आमच्या पक्षाची भूमिका व मते जुळली तर मनसेच काय अशा समविचारी कोणत्याही पक्षाशी मैत्री शक्य आहे, असे पाटील म्हणाले होते.