मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर आणि पक्षाने सत्ता गमावल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान, परळीतून पराभवाचा सामना पत्काराव लागल्याने पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होत्या. यावर बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नाराजी ऐकून घेतली असून दोघेही पक्ष सोडणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे.
“पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत. या सर्व मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपाचेच बाळकडू मिळालं आहे. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्या गोपीनाथ गडावर मला निमंत्रण असून मी जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंकजा मुंडेंच्या पोस्टरवरून कमळ गायब !
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त उद्या ( १२ डिसेंबर ) गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला अवघा एक दिवस बाकी आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे, संपूर्ण परळीत मेळाव्याचे पोस्टर लावले जात आहे. परंतु, या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. पोस्टरवर कुठेही भाजपचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. त्याठिकाणी भाजपचे झेंडेदेखील लावण्यात आलेले नाही. या मेळाव्याच्या पोस्टरवरून असे दिसून येते आहे की, पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Visit : bahujannama.com