बहुजननामा ऑनलाईन
सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावीस सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले. यानंतर आता मराठा आरक्षणावरुन राजकारण सुरु झाले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग 5 मिनिटं बोलून दाखवावं अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राज्यभर उटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं. मुख्यमंत्र्यांना विषय माहिती नसले तर तो विषय समजून घेण्याची तयारी पाहिजे असा सल्लाही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. मराठा संदर्भात संबंधित मंत्री अशोक चव्हाण किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीत ठाणं मांडून बसायला हवं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेस नेत्यांची अनेक वर्षाची मानसिकता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत गांभीर्य पूर्वक प्रयत्न केले गेले नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास – रोहित पवार
सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतर राज्यात राजकारण सुरु झाले असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अंतिम निकाल हा आरक्षणाच्या बाजूने लागेल असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करु नये, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं 10 टक्के आरक्षण हे दोन्ही प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडे सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी #MVA सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.