नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील परकीय चलनसाठा ३१ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात ११.९४ अब्ज डॉलरने मोठ्या प्रमाणात वाढून ५३४.५७ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. गुरुवारी चलनविषयक धोरणाची घोषणा करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, ५३४.६ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनसाठा १३.४ महिन्यांच्या आयात खर्चाच्या समान आहे.
ते म्हणाले की, २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत (३१ जुलै पर्यंत) चलनसाठ्यात ५६.८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. २४ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा ४.९९३ अब्ज डॉलरने वाढून ५२२.६३० अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. यापूर्वी ५ जून रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच देशातील परकीय चलनसाठा ५०० अब्ज डॉलर्सच्या पातळीवर गेला होता. देशाच्या परकीय चलनसाठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे ३१ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्तेत (एफसीए) होणारी वाढ, जी एकूण साठ्यांचा एक महत्त्वपूर्ण भाग असते. रिझव्र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात परकीय चलनाची मालमत्ता १०.३५ अब्ज डॉलरने वाढून ४९०.८३ अब्ज डॉलरवर गेली आहे.
रिझव्र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात सोन्याचा राखीव साठा १.५३ अब्ज डॉलरने वाढून ३७.६३ अब्ज डॉलर झाला आहे. रिझव्र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील विशेष रेखांकन अधिकार १.२ कोटी डॉलरने वाढून १.४८ अब्ज डॉलरवर गेले आहे, तर आयएमएफमधील देशातील राखीव चलनसाठा ५.४ कोटी डॉलर्सने वाढून ४.६४ अब्ज डॉलरवर गेला आहे.