नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आगामी (बायोपिक )चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. निवडणूक आयोगाने या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. उद्या म्हणजेच ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.
उद्यापासून लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात होत आहे. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाल्यास त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यांनतर हा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते.
निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास सर्व पक्षांना समान संधी मिळणार नाही. तर मोदींच्या बायोपिकमुळे निवडणुकीत भाजपाला झुकतं माप मिळू शकतं, असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळावी यासाठी आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला लोकसभा निवडणूक काळापर्यंत स्थगिती दिली आहे.