बीजापुर : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जवानांनी 6 किलोमीटरचा रस्ता पायी पार करून एका गरोदर महिलेला रूग्णालयात पोहोचवले. हा दुर्गम भाग असल्याने येथे वाहनाची व्यवस्था नाही. यामुळे जवानांनी गरोदर महिलेला खांद्यावर घेऊन पायी चालत रूग्णवाहिकेपर्यंत पाहोचवले. तेथून तिला रूग्णालयात नेण्यात आले. माहितीनुसार, रूग्णालयात पोहचल्यानंतर महिलेने एका मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ सुखरूप आहेत. सध्या या महिलेवर जिल्हा रूग्णालयात आवश्यक ते उपचार सुरू आहेत.
अशी केली महिलेला मदत
मंगळवारी बीजापुर परिसरातील सीआरपीएफची टीम पेट्रोलिंग करत होती. सर्चिंगच्या दरम्यान घनदाट जंगलात एक महिला त्यांना दिसली. ही महिला खुप आजारी होती आणि बाळंतकळांनी विव्हळत होती. जवळपास उपचाराची काहीही व्यवस्था नव्हती. यानंतर सीआरपीएफ जवानांनी या महिलेची मदत करण्याचा निर्णय घेतला. जवानांनी खाटेचा वापर करून महिलेला खांद्यावर उचलले. आणि 6 किलोमीटर अंतर पार करून महिलेला रूग्णवाहिकेपर्यंत नेले. यानंतर गरोदर महिलेला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कोब्रा बटालियनच्या जवानांनी केली मदत
काही महिन्यांपूर्वी बीजापुरच्या तररेम परिसरात सुद्धा जवानांनी एका जखमी ग्रामीण तरूणाची मदत केली होती. खाटेवर ठेवून त्याला खांद्यावरून 5 किलोमीटर पायी चालून रूग्णालयात पोहोचवले होते. बासागुडा परिसरात कोब्रा बटालियन 204, 210, 241 बस्तरीया बटालियन आणि 168 बस्तरीया बटालियनची टीम गस्तीवर निघाली होती. गस्त घालताना जवान बुडगीचेरु गावात पोहचले, तेथे त्यांना एक जखमी युवक आढळला. जवानांनी त्याला मदत केली आणि वेळेत त्याला रूग्णालयात पोहोचवले.
Visit : bahujannama.com