पटणा : वृत्तसंस्था – बिहारच्या सुपौ जिह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त 20 रुपयांच्या गुटख्यामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. किराणा दुकानदार मिथिलेश कुमारने आरोपी अजितकुमारला 20 रुपयांचा गुटखा उधार देण्यास नकार दिला होता. त्याला याचा राग आला आणि याच रागातून आरोपीने दुकानदारावर गोळी झाडली. यामध्ये दुकानदाराचा मृत्यू झाला.
बिहारच्या सुपौ जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथे ही घटना घडली. आरोपी अजितकुमार हा किराणा दुकानात गेला होता. त्यादरम्यान त्याचा मिथिलेश कुमारच्या वडिलांसोबत वाद झाला होता. त्यादिवशी अजितकुमार मिथिलेशच्या वडिलांकडे गेला. अजितकुमारने मिथिलेश याच्या वडिलांकडे 20 रुपयांचा गुटखा उधार मागितला. पण हा 20 रुपयांचा गुटखा उधार देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. याच वादावरून मंगळवारी सकाळी अजितकुमार हा त्याच्या दोन इतर सहकाऱ्यांसोबत पुन्हा तिथं गेला. पण त्यावेळी त्याचे वडील दुकानात नव्हते. त्यावेळी दुकानात त्यांचा मुलगा मिथिलेश कुमार बसला होता.
अजितकुमार आणि मिथिलेश कुमार या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर अजितकुमार याने मिथिलेश कुमारवर गोळी झाडली आणि हत्या केली. जेव्हा मिथिलेशवर गोळी झाडली त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ तेथेच उपस्थित होता. पण जेव्हा तो दुकानात पोहोचला तेव्हा हा गोळीबार झाला होता आणि हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले होते.