पटणा : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच कोरोनाग्रस्त मृतांचा आकडाही वाढतच आहे. त्यातच आता बिहार सरकारचे मुख्य सचिव अरुण कुमार सिंह यांचे निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यानुसार, त्यांच्या उपचारही सुरु होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले.
1985 बॅचचे आयएएस अधिकारी अरुण कुमार सिंह हे मुख्य सचिव होण्यापूर्वी बिहारचे विकास आयुक्त होते. याचवर्षी त्यांच्याकडे बिहारच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. अरूण कुमार सिंह यांना 15 एप्रिलला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना पटणा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तेथेच त्यांचे निधन झाले. अरुण कुमार सिंह यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर कॅबिनेट बैठकीदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दु:ख व्यक्त केले.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्याने बिहारच्या अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव रवी शंकर चौधरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना पटणा येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालवत होती. अखेर 23 एप्रिलला त्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.