पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला (pimpri-chinchwad-congress-city-president-sachin-sathes-resigns) आहे. वैयक्तिक कारणास्तव जबाबदारीतून मुक्त होत आहे, असे साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र गेल्या पंधरा वर्षांत शहरातील काँग्रेसला न्याय मिळालेला नाही. तसेच विधानपरिषद निवडणूकीत डावलल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
साठे मागील सहा वर्षांपासून शहर काँग्रेसचे नेतृत्व करत होते. पडत्या काळात त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली होती. त्यांनी विविध आंदोलने करुन शहरात पक्ष जिवंत ठेवला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने सरकार स्थापन झाले. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेसाठी नावे द्यायची होती. त्यात काँग्रेसतर्फे शहरात संघटन वाढविण्यासाठी आमदारकीची संधी मिळावी, अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र, आमदारांमध्ये शहरातील काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश नाही. त्यामुळे शहराध्यक्ष साठे यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेस माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला अध्यक्ष गिरीजा कुदळे, सेवा दलाचे संग्राम तायडे, विष्णपंत नेवाळे, श्याम आगरवाल, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.
विद्यार्थी, युवक संघटनेपासून गेल्या 24 वर्षांपासून शहरात पक्षाचे काम करत आहे. गेल्या 6 वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून काम करत होतो. तन,मन धनाने पक्षाचे काम केले. वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होत आहे. यापुढे देखील पक्षाचे काम निष्ठेने करणार आहे. मी विधानपरिषदेची उमेदवारी निश्चितपणे मागितली होती. पण संधी नाही मिळाली.
-सचिन साठे, शहराध्यक्ष काँग्रेस