लखनऊ : वृत्तसंस्था – कोरोनाविरुद्धची (Corona Vaccine) लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता असून प्रत्येक राज्यांनी लसीकरणाची तयारी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये कोरोना लसीकरणावरून जोरदार तयारी सुरु झाली आहे. आरोग्य विभागाने लसीकरणाचा प्लॅन देखील आखला आहे. या योजनेनुसार ब्लॉक स्तरावर कॅम्प लावले जाणार आहेत. यामध्ये एक आरोग्य सेवक (Employee) दररोज 100 लोकांना लस टोचणार आहे. तसेच त्यावेळी प्रमाणपत्र देखील दिले जाणार असून लसीकरणाचा मेसेज संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर पाठविला जाणार आहे.
भारत सरकारकडे तीन कंपन्यांनी आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये सिरम, फायझर आणि भारत बायोटेकने अर्ज केला आहे. या अर्जावर विचार करण्यासाठी केंद्राची एका समितीने बुधवारी दुपारी चर्चा केली. यानंतरचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला पाठविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे.
आरोग्य महासंचालक डॉ. डीएस नगी यांनी सांगितले की, आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात लस पाठवली जाणार आहे. यानंतर ब्लॉक स्तरावर कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक कर्मचारी 100 लोकांना लस टोचणार आहे.
28 दिवसांनी दुसरा डोस
पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. सीएमओ डॉ. संजय भटनागर यांच्या म्हणण्यानुसार कोरोना लस दिल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. यासोबत लसीचा पहिला डोस दिल्यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्य नंबरवर पहिल्या डोसची तारीख आणि दुसऱ्या डोसची तारीख याचा मेसेज पाठवला जाणार आहे.
लसीकरणानंतर 30 मिनिटे निरिक्षणाखाली
व्यक्तीला लस टोचल्यानंतर त्याला 30 मिनिटे निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणासाठी कोल्ड स्टोरेजच्या तीन खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या खोलीत ज्यांना लस द्यायची आहे त्यांना थांबवण्यात येईल. दुसऱ्या खोलीत कोरोना लस दिली जाणार आहे. तर तिसऱ्या खोलीत डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्या व्यक्तीला ठेवण्यात येणार आहे. जर या कालावधीत संबंधीत व्यक्तीला समस्य उद्भवल्यास त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केले जाणार आहे.