नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जात आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळविले आहे. मुकेश अंबानी हे जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आशिया खंडातील ते एकमेव व्यक्ती आहेत. टेस्लाच्या एलन मस्क यांना देखील मुकेश अंबानी यांनी मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स च्या मते, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 72.4 अब्ज डॉलर इतकी आहे. याअगोदर मुकेश अंबानी यांनी आठव्या स्थानावरच्या जगातील सर्वात मोठे गुंतावणूकदार व हाथवे बर्कशायरचे वारेन बफे यांची जागा घेतली होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये कायम फायदेशीर गुंतवणूक होत आहे, हेच चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. मार्चनंतर आतापर्यंत ‘रिलायन्स’च्या शेअर्समध्ये दुप्पट वाढ झालीय. ‘रिलायन्स’ समूहाची टेक्नॉलॉजी कंपनी असणाऱ्या जिओ प्लॅटफॉर्म्स मध्ये जगभरातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केलीय. या गुंतवणुकीची सुरुवात यंदा फेसबुक सारख्या कंपनीपासून झाली होती. मागील तीन महिन्यात जिओ प्लॅटफॉर्ममध्ये एकूण 12 विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली असून त्यात फेसबुक, सिल्ह्वर लेक पार्टनर्स, विस्टा, जनरल अटलांटिक, KKR, मुबाडाला, ADIA, TPG, L Catterton, PIF अशा एकूण 12 विदेशी कंपन्यांचा समावेश आहे.
भागीदारी विकून जिओने आतापर्यंत 117,588.45 कोटींची कमाई केली असून आरआयएलला जिओ प्लॅटफॉर्मच्या 25.09 भागीदारीसाठी गुंतवणूक मिळाली आहे. Amazonचे सीईओ जेफ बेजोस श्रीमंतांच्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून त्यांची नेटवर्थ 184 अब्ज डॉलर आहे. तर या यादीमध्ये अनुक्रमे बिल गेट्स (नेटवर्थ- 115 अब्ज डॉलर), बर्नार्ड अरनॉल्ट (नेटवर्थ – 94.5 अब्ज डॉलर), मार्क झुकरबर्ग (नेटवर्थ – 90.8 अब्ज डॉलर), स्टेले बालमर (नेटवर्थ-74.6 अब्ज डॉलर) आणि सहाव्या क्रमांकावर मुकेश अंबानी (नेटवर्थ 72.4 अब्ज डॉलर) आहेत.