सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सोलापूरमधील मोठ्या रुग्णालयापैकी एक असलेल्या मार्केडेय सहकारी रुग्णालयातील बंद ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मार्केडेय सहकारी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतात. येथे नवीन ऑक्सिजन टँक उभारण्यात आल्याने जुना टँक बंद होता. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या जुन्या ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला. त्यातून मोठ्या प्रमाणावर पांढरी पावडर सर्वत्र पसरली. त्यात अनेकांचा अंगावर ही पावडर पडल्याने एकच घबराट निर्माण झाली. सर्व परिसरात पांढर्या पावडरीचा थर पडलेला दिसून येत होता. अंगावर पावडर पडलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच महापालिका अधिकारी, अग्निशामन दल, पोलीस घटनास्थळी पोहचले. केमिकल रिअॅक्शनमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन ऑक्सिजन टँक व्यवस्थित असल्याने रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत आहे.