नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पुन्हा एकदा व्याजदरामध्ये कपात केली जाऊ शकते. काही महिन्यांपूर्वी प्रोव्हिडंट फंडच्या व्याजदरामध्ये कपात झाली होती. हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे कारण गुंतवणुकीवर रिटर्न घटत आहे, कॅश फ्लो देखील कमी झाला आहे, यामुळे 60 मिलियन ग्राहकांच्या सेवानिवृत्तीच्या बचतीवरील पेमेंट कमी होणार आहे.
व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी ईपीएफओचा फायनान्स विभाग, इन्व्हेस्टमेंट विभाग आणि ऑडिट कमिटी लवकरच एक बैठक घेणार आहेत. यानंतर निर्णय घेतला जाईल की ईपीएफओ किती व्याजदर देऊ शकते. मार्च महिन्याच्या सुरूवातीला नवीन व्याजदर 8.5 टक्क्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याकरता अर्थ मंत्रालयाची मंजूरी मिळाली नाही आहे. कामगार मंत्रालयाकडून तेव्हाच नोटिफाय केले जाईल जेव्हा अर्थ मंत्रालयाकडून मंजूरी मिळणार आहे.
कोरोनाच्या संकटकाळात कर्मचारी आणि नियोक्ते यांना मदत करण्यासाठी मार्चपासून भविष्य निर्वाह निधीशी संबंधित काही उपाययोजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे योगदान तीन महिन्यांपासून कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या मूलभूत वेतनाच्या 12% वरून 10% पर्यंत कमी केले गेले आहे. त्याचप्रमाणे कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार आता ईपीएफओ देशातील कोणत्याही प्रादेशिक कार्यालयात केलेले दावे निकाली काढण्यास सक्षम असेल. याअंतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, आंशिक पैसे काढणे याप्रकारचे ऑनलाईन दावे सुलभरित्या पूर्ण करता येतील.