Bibvewadi Pune Crime News | पुणे : सराईत गुंड माधव वाघाटेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पवन गवळीवर गोळीबार; बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना केली अटक

पुणे : Bibvewadi Pune Crime News | सराईत गुंड माधव वाघाटे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी पवन गवळी याच्यावर सोमवारी भर दुपारी गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे याच्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. (Firing In Bibvewadi)
सनी शंकर जाधव (वय २३, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी), सलमान ऊर्फ सल्या हमीद शेख (वय २५, रा. अप्पर बिबवेवाडी) आणि हर्षल संतोष चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. माधव वाघाटे याच्या खुनानंतर त्याची टोळी सनी जाधव हा चालवत आहे. त्याच्या खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, लोकांवर हल्ले करणे, घातक शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गंभीर १३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला १८ मार्च २०१९ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपारीनंतरही त्याची गुन्हेगारी प्रवृत्त थांबत नसल्याचे त्याला एमपीडीए अंतर्गत २९ डिसेबर २०२० रोजी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथून सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरु राहिल्याने त्याच्यावर नोव्हेंबर २०२३ मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. (Three Arrest In Attempt To Murder Case)
सलमान शेख याच्यावर दोन खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, बेकायदा जमाव जमविणे, असे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार माधव वाघाटे (वय २८) याच्यावर८ ते १० जणांनी हल्ला करुन त्याचा खुन निर्घुण खुन केला होता. ही घटना १५ मे २०२१ रोजी घडली होती. व्हॉट्स अॅप स्टेटसवरुन झालेल्या वादातून हा खुन झाला होता.
या खुनानंतर माधव वाघाटे याची धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यात जवळपास १२५ बाईक्स सहभागी झाल्या होत्या. या बाईक रॅलीवरुन शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पुणे पोलीस खडबडून जागे होऊन त्यांनी बाईक रॅलीत सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या अटकेचे सत्र सुरु केले होते. असंख्य बाईकही जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बराच काळ या दोन टोळ्यांमध्ये शांतता होती.
माधव वाघाटे याच्या खुन प्रकरणात पवन सतीश गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी ओटा स्कीम, बिबवेवाडी) याच्यासह बिबवेवाडी पोलिसांनी अनेकांना अटक केली होती.
पवन गवळी हा सध्या बॅड व्यवसाय करीत आहे. एका ऑर्डर घेऊन तो सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता घरी चालला होता. यावेळी संविधान चौकाकडून व्हीआयटी कॉलेजकडे जात असताना संविधान चौकाजवळच एका गल्लीतून चार जण आले. त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तुल होते. तर, दोघांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी पवन गवळी याला तलवारीचा धाक दाखवून थांबविले. त्याच्याजवळ येऊन थांब तुला खल्लास करतो, असे म्हणून पाठीमागून गोळी झाडली. ती पवन याच्या कमरेला लागली. त्यानंतर ते पळून गेले. जखमी अवस्थेत पवन याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (DCP Rajkumar Shinde) यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पवन गवळी याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य ५ ते ७ जणांचा शोध सुरु आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे तपास करीत आहेत.