नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान संपले असून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार भुजबळ जाहीर सभेतून करणार आहेत. भोपाळ मतदारसंघातून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे. त्यामुळे भुजबळ नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .
प्रज्ञा सिंग यांनी करकरे आणि राज्य पोलिसांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ भोपाळमध्ये प्रचार करणार आहेत.ते मंगळावारी सकाळी ११.३० वाजता भोपाळ येथे पत्रकार परिषदेस संबोधित करणार आहेत. त्यानंतर काँग्रेस आघाडीचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या प्रचारार्थ नरेला विधानसभा येथे त्यांची सभा होणार आहे.
भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांच्या सभेला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व आहे. त्याचप्रमाणे बोलण्याची आक्रमक शैली त्यामुळे विरोधक त्यांचा धसका घेत असल्यामुळे त्यांना मध्य प्रदेशमध्ये सभेसाठी बोलावण्यात आले आहे .