Bhosari Assembly Constituency | ‘आखाडा भोसरीचा, पैलवान कोणीही असू द्या वस्ताद आमच्याकडे’, शिवसेना नेत्याचे मोठे वक्तव्य; लांडगेंविरोधात शरद पवारांची मोठी खेळी

September 30, 2024

पुणे: Bhosari Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) सामना झाला. यामध्ये महायुतीला फटका बसला तर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. दरम्यान महाविकास आघाडीचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. मात्र आता पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) भोसरी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आज भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते रवी लांडगे (Ravi Landge) यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. रवी लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून (BJP) ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ते भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात आलेल्या अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनीही या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआ मध्ये थोडीफार डोकेदुखी वाढू शकते.

माध्यमांशी बोलताना रवी लांडगे म्हणाले, “मी पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. भोसरी मतदारसंघ माझा दोन वेळा फिरून झाला आहे. ही जागा शिवसेनेकडे आहे आणि मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण जागा कुणालाही सुटली तरी मी एकनिष्ठेने काम करेल असे मी पवार साहेबांना बोललो आहे. तर, आखाडा भोसरीचा असला तरी पैलवान कोणीही असू द्या वस्ताद आमच्याकडे आहे”, असे म्हणत लांडगे (Mahesh Landge) यांना इशारा दिला आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे हे आमदार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून रवी लांडगे आणि अजित गव्हाणे या दोघांनी तयारी सुरू केली आहे. तर अजित पवार यांच्या पक्षातील नेते विलास लांडे यांनी देखील पवारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळू शकतात.