बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली असून, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, निवडणूक बिनविरुद्ध होणार की भाजप आपला उमेदवार मैदान उतरवणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
विधासनभेचे पद रिक्त झाल्यावर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राची यादी मागवली आहे. फेब्रुवारी अखेर अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंढरपूर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
राजकीय नेत्यांची तयारी
निडवणुकीसाठी किती मतदान यंत्रे लागनार आहेत, याची प्रशासनाकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी राजकीय नेत्यांची बैठकही घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, पंढरपुरात राजकीय नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.
निवडणूक बिनविरुद्ध ?
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण केले जाणार असून, मगच उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजपचा उमेदवार कोण असेल, हे अजूनही कळायला मार्ग नाही. तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाचे पाठबळ असणार आहे. तथापि, आमदार-खासदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बहुतांश बिनविरुद्ध करण्यात येते. यामुळे भाजप मैदानात न उतरता ही निवडणूक बिनविरुद्ध करणार, की राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार हे आगामी काळात कळणार आहे.