नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – नांदेड येथील आयुर्वेदिक रूग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज व मध्यवर्ती बसस्थानकास छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही याची दखल न घेतल्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोणत्याही महापुरुषांची नावे देण्यात न आलेल्या या वास्तुंना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज दोन महापुरूषांची नावे देण्यात यावीत अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. त्यात नांदेड शहरातील आयुर्वेदिक रूग्णालय या ठिकाणाला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव तर मध्यवर्ती बसस्थानकाला आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माधवराव पा. देवसरकर यांनी दिला.
या भजन आंदोलनात प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, गजानन पा. माने, प्रशांत मुळे, विलास इंगळे, मंगेश कदम, गणेश काळम, जिल्हाध्यक्ष सुनिल पा. कदम, तिरूपती पा. भगनुरे, संतोष माने, वि. आ. सदा पा. पुयड, अनिकेत शिंदे, प्रकाश घोगरे, नवनाथ जोगदंड, वैभव राजूरकर, सतीश पा. खानसोळे, शिवाजी जाधव, राज शिंदे, बालाजी कऱ्हाळे, अमोल वानखेडे, प्रमोद वानखेडे, अविनाश हिवराळे, वैभव भिसीकर, महेश जाधव, शिवम जाधव, श्री पा. खराणे, निरंजन कदम, संतोष शिंदे, सुनील पा. मातूळकर, श्री पा. जाधव आदी लोक उपस्थित होते.