नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठवड्यात बंगळुरूमध्ये ऑर्डर कॅन्सल केल्याने तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला जामीन मंजूर झाला आहे. पण आता डिलिव्हरी बॉयनेच आरोप केलेल्या हितेशा चंद्रानी हिच्यावरच उलट आरोप करून तिच्याविरोधात बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार हितेशाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या घटनेला वेगळ वळण लागले आहे.
कामराज असे या तक्रार दिलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. कामराजने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पहिल्यांदा हितेशानेच मला शिव्या दिल्या आणि चपलेने मारहाण केली. ट्रॅफिकमुळे डिलिव्हरी करण्यास थोडा उशीर झाला होता. त्यामुळे मी त्यांची माफी मागितली होती. पण त्या खूप रागात होत्या. ऑर्डर घेऊनही त्यांनी डिलिव्हरीचे पैसै देण्यास नकार दिला आणि झोमेटॉच्या कस्टमर केअरसोबत बोलत असल्याचे सांगितले.
या दरम्यान झोमॅटो सपोर्ट स्टाफने त्यांची ऑर्डर रद्द केल्याचे मला सांगितले. त्यावर मी त्यांच्याकडून ऑर्डर परत मागितली पण त्यांनी सहकार्य केले नाही. अखेर मी ऑर्डर न घेता इमारतीमधून बाहेर पडत होतो. त्याचवेळी त्यांनी मला चपलने मारहाण करायला सुरुवात केली. मी स्वतःचा बचाव करत होतो, पण त्यावेळी मला मारण्याच्या नादात हितेशा यांच्या हातातील अंगठी त्यांच्याच नाकावर लागली आणि रक्तस्त्राव सुरू झाला, असा आरोप कामराजने केला आहे.