परळी वैजनाथ : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. काही ठिकाणी केक कापून तो मुलांना वाटण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागले. ८१ किलो वजनाचा केक खाण्यासाठी स्टेजवर एकच झुंबड उडाली. त्यामुळे चेंगरा चेंगरी होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार करीत सर्वांना स्टेजवरुन खाली उतरविले.
परळी शहरात मोंढा मैदानावर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेते गोविंंदा या कार्यक्रमाचे आकर्षण होते. यावेळी ८१ किलोचा केक तयार करण्यात आला होता. हा केक स्टेजवर आणण्यात आला. गोविंदा यांच्या हस्ते हा केक कापण्यात आला. स्टेजवरील प्रमुख व्यक्तींनी केकचा तुकडा एकमेकांना भरविला. या कार्यक्रमानंतर केक खाण्यासाठी प्रेक्षकातील तरुण, लहान मुलांनी स्टेजवर धाव घेतली. जास्तीत जास्त केक आपल्या हाती लागावा, यासाठी सर्वांची धडपड सुरु झाली. त्यात काही तरुणांनी दोन्ही हातांनी केक ओरबाडून घेतला. ढकलाढकली सुरु झाली. तेव्हा काही लहान मुलांनी केक उचलून समोर असलेल्यांकडे फेकायला सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्यावर कार्यकर्ते व पोलिसांनी स्टेजवर जाऊन सर्वांना हुसकावून लावले.