बहुजननामा ऑनलाइन टीम – रेणू शर्माने बलात्काराचे आरोप मागे घेतल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा शिरुर कासार येथे जेसीबी मशिनमधून त्यांच्यावर पुषवृष्टी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच एक भला मोठा हार क्रेनच्या सहाय्याने त्यांना घातला गेला. अशाप्रकारे स्वागत झाल्याने धनंजय मुंडे चांगलेच भारावून गेल्याचे दिसून आले.
७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी विश्रामगृहात तोबा गर्दी केली. तेव्हा नागरिकांच्या प्रश्नांवरुन मुंडे यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारात फैलावर घेतले. कामात कोणत्याही प्रकारची हयगय नको, अशी तंबी मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण पार पडल्यावर पोलीस परेड करत मानवंदना देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसोबत बीडकरांनी यावेळी मोठी गर्दी केली. मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासकामात कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली.
मुंडे भावुक
“एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अशा कठीण काळात आपण सर्वानी माझ्या पाठीशी ताकद उभा केली. मी शब्दांत आभार मानू शकत नाही. माझ्या अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला घातले तरीही आपले उपकार फिटू शकत नाही,” अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली.