बीडः बहुजननामा ऑनलाईन – भावकीच्या वादातून भर रस्त्यात एका तरुणावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात शनिवारी (दि. 1) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
बबलू पवार असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलू पवार याला येळंब घाट परिसरात अडवून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आला. भावकीतीलच मधूकर पवार यांंनी हा हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत एक ते दीड तास रस्त्याच्या कडेला बबलू हा तडफडत पडला होता. स्थानिकांनी त्याला पाहिले. पण भांडणाच्या दहशतीमुळे कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर पत्रकारांनी रुग्णवाहिकेला फोन केला आणि त्याला उपचारासाठी नेकनूरला पाठवले.
सध्या त्याची प्रकृती गंभीर असून बीड येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर मारहाण केलेल्या आरोपी मधुकर पवार यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत कोणीही ट्रॅक्टर विझवण्यासाठी किंवा अगदी ट्रॅक्टरच्या जवळच बांधलेल्या जनावरांना वाचवण्यासाठीही पुढे आले नव्हते. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर जनावरांना बाजूला काढून स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला लागलेली आग आटोक्यात आणली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.