बीड : बहुजननामा ऑनलाईन – भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात मोठ्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. बीड जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तत्काळ कमी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक (लातूर) यांचे दिले आहेत. तसेच जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी बी.एस.देशमुख यांना निलंबित करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.
बचत खात्याऐवजी कर्ज खात्यात रक्कम वर्ग करणे बँकेला महागात पडले आहे. या संदर्भात शेतकरी नेते कालिदास अपेट यांनी तक्रार केली होती. त्यानुसार सहकार कायदा १९६० यामधील कलम ७९ व इतर पोट कलमान्वये दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याच्या भावना कालिदास अपेट यांनी व्यक्त केली आहे. कर्ज माफीमधील प्रोत्साहनाची रक्कम बचत खात्यात जमा करण्याऐवजी कर्ज खात्यात जमा करून अफरातफर केल्याचा ठपका आदित्य सारडा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कमेच्या फेरफारी संदर्भात ठपका ठेवत विभागीय सहनिबंधकाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले आदित्य सारडा ?
कर्ज माफीमधील संपूर्ण रक्कम लाभार्थीना देण्यात आली. उलट प्रोत्साहनासाठी मिळाल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार कर्ज देऊ शकलो, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले. तसेच या बाबतीत कायदेशीर पद्धतीने जाणार आहोत असे सांगितले. डबघाईला आलेली बँक सुस्थितीत आणताना बँकेने हा निर्णय घेतला होता. या बाबतीत कुठल्याही खातेदाराची तक्रार नाही.
Visit : bahujannama.com