Beed Crime News | बीड पुन्हा हादरलं! लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने वार करत सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, तिसरा गंभीर जखमी

बीड : Beed Crime News | मागील काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात खुनाच्या सत्रांमध्ये वाढ झाली आहे. जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार (दि.१६) अंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोघांचा मृत्यू झाला आहे तर कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी आहे. रात्री १० वाजताच्या दरम्यान त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. (Double Murder In Beed)
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील हातळोण येथील अजय भोसले, भरत भोसले आणि कृष्णा भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे अमोल शिरसाठ यांनी भेट दिली. या घटनतेतील ७ संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून कोणत्या कारणाने झाला? याचा पोलीस तपास करीत आहेत.
Comments are closed.