नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात यावर्षी होणार्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासोबतच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजेच एनपीआरही लागू करण्यात येईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु, दुसरीकडे एनपीआरला मोठा विरोध होत असून असहकार करण्याची चर्चा होत असतानाच गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती एनपीआरसाठी माहीती देण्यास नकार देत असेल अथवा जाणीवपूर्वक खोटी माहिती देत असेल तर अशा व्यक्तीकडून 1000 रूपये दंड वसूल केला जाऊ शकतो.
गृह मंत्रालयाच्या अधिकार्याने म्हटले की, नागरिकत्व नियमाच्या नियम 17 नुसार चुकीची माहिती दिल्यास 1000 रूपये दंड लावण्यात येईल. परंतु, या तरतुदीचा वापर 2011 आणि 2015 च्या एनपीआरमध्ये करण्यात आला नव्हता.
अरुंधती रॉय यांनी केले होते हे वक्तव्य
डिसेंबरमध्ये सीएए, एनपीआर आणि एनआरसी विरोधात होत असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या लेखिका अरुंधती रॉय यांनी लोकांना सांगितले होते की, जेव्हा अधिकारी माहीती मागण्यासाठी घरी येतील तेव्हा त्यांना चुकीची माहिती द्या. अधिकार्यांनी एनपीआरसाठी तुमचे नाव विचारले तर रंगा-बिल्ला, कुंगफू-कट्टा सांगा.
एनपीआरच्या अधिकार्यांनी सांगितले की, प्री-टेस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीने आपले आधार, मतदान ओळख पत्र, ड्रायव्हिंगग लायसेन्स किंवा पासपोर्टची माहिती देण्यास संकोच दाखवला नाही. मात्र, काही लोकांचा पॅन नंबर देण्यावर आक्षेप होता.
पॅन नंबरचा ऑप्शन हटविला
अधिकार्याने सांगितले की, लोकांचा आक्षेप असल्याने आम्ही पॅन कार्डचा कॉलम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्री-टेस्टमध्ये 73 जिल्हे घेण्यात आले होते. यात सुमारे 30 लाख लोकांचे नमुने घेण्यात आले.
एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले, 80 टक्के प्रकरणात, उत्तर देणार्यांनी आपल्या मर्जीने माहिती दिली. परंतु, पॅनची माहिती देण्यास अनेकांनी नापसंती दर्शवली. ज्यानंतर आम्ही एनपीआरमधून हा कॉलम हटविण्याचा निर्णय घेतला.
तर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आधार, मतदान ओळख पत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसेन्स नंबरची माहिती देणे अनिवार्य नाही.
गृह मंत्रालयाने या अफवांचे केले खंडन
काही मीडिया रिपोर्टला उत्तर देण्यासाठी एमएचए प्रवक्त्याने ट्विट केले. यात म्हटले आहे की, बातमीत सांगितले जात आहे की, आधार, पासपोर्टची माहिती एनपीआरसाठी द्यावी लागेल, मतदान ओळख पत्र आणि ड्रायव्हिंग लायसेन्सची माहितीही आवश्यक आहे. परंतु, ही चुकीची माहिती आहे, एनपीआरसाठी हे कागदपत्र अनिवार्य नाहीत.